थंडीचे दिवस सुरू झाल्याने पहाटे बोचणाऱ्या थंडीत फिरायला जाण्याचा मोह प्रत्येकालाच होतो, परंतु रोजच्या रहाटगाड्यात सुट्टी घेऊन फिरायला जाणे प्रत्येकालाच शक्य नसते. सुट्टीच्या दिवसांत पर्यटन, तीर्थक्षेत्रांना भेटी देतात, परंतु मुंबईला (Mumbai) लागूनच असलेल्या ठाणे जिल्ह्यात बरीच पर्यटनस्थळे असून, त्यातील एक पर्यटन तथा तीर्थस्थळ सध्या सर्वांना भुरळ घालत आहे. या ठिकाणी देवदर्शनाप्रमाणेच निसर्गाचा आनंद, तेथील खाद्यसंस्कृतीचा आस्वादही घेता येतो. मूळगाव (Mulgaon Shivkalin temple) (ता. अंबरनाथ) असे या ठिकाणाचे नाव असून, खंडोबा हे येथील शिवकालीन जागृत देवस्थान (श्री खंडोबा मंदिर) आहे. हिवाळा, पावसाळ्यात येथे भाविक मोठ्या संख्येने येतात.

मूळगाव येथील खंडोबा मंदिराला सुमारे ५५५ पायऱ्या आहेत. यातील काही पायऱ्या चढून वर जातना मध्ये देवाच्या पावलांचे दर्शन घडते. तेथून वर जातानाच उजव्या बाजूला देवाचे वाहन असलेल्या घोड्याच्या पावलांचे ठसे नजरेस पडतात. तेथून पुढे गेल्यानंतर मंदिराच्या कळसाचे दर्शन घडते आणि तोंडून आपोआप ‘यळकोट यळकोट… जय मल्हार…’ असा मल्हार मार्तंडाचा जयघोष निघतो. या ठिकाणी पहाटे दर्शनासाठी गेल्यास मंदिराच्या आवारातील नजारा डोळ्यांचे पारणे फेडतो. डोंगराच्या माथ्यावरून खाली पायथ्याशी घनदाट झाडी, त्यावर धुक्याची, ढगांची पसरलेली दाट चादर, सूर्योदयाचा रम्य असा नजारा अनुभवता येतो.

एका बाजूला बारवी धरण, हिरवाईने नटलेला घनदाट जंगल परिसर आणि दुसऱ्या बाजूला नजरेस पडणारा श्री मलंगगड रोड… दोन डोंगरांच्या मध्ये बसलेली गावे, शुद्ध हवा, शांतता अनुभवली की मनावरील ताण हलका झाल्याशिवाय राहत नाही. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर समोरच खंडोबाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आहे. त्याच ठिकाणी श्री खंडोबा, म्हाळसा आणि बानू अशी तीन शिवलिंगे आहेत. याच ठिकाणी एक छोटे छिद्र असून, त्यातून पूर्वी भंडाऱ्याची उधळण होत असे, परंतु कालांतराने ते बुजले गेले आणि त्यातून भंडारा येणे बंद झाल्याचे ग्रामस्थ सांगतात.

उत्सव आणि बरेच काही… मार्गशीर्ष महिन्यात चंपाषष्ठीला खंडोबाला दुपारी २ वाजता हळद लावली जाते. त्यानंतर पौष महिन्यात शाकंभरी पौर्णिमेला सायंकाळी ५ वाजता देवाचा लग्न उत्सव असतो. या दिवशी भाविक मोठ्या संख्येने मंदिरात दर्शनासाठी येतात. महाप्रसादाचे आयोजन ग्रामस्थांच्या वतीने केले जाते; तर माघ महिन्यात यात्रा असते. त्या वेळी गावातील हनुमानाच्या मंदिरातून पालखी निघते, ती गडावर जाऊन देवाचे दर्शन घेऊन नंतर गावात फिरते. दुपारी ३ ते ६ या वेळेत कुस्त्यांचा आखाडा गावात रंगतो व सायंकाळी मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

“दर महिन्याला आम्ही खंडोबाचे दर्शन घेण्यास येतो. देवदर्शनासोबतच पायऱ्या चढताना आपल्या शारीरिक क्षमतेचा अंदाज येतो. तसेच आजकाल शहरात पहाटेदेखील शुद्ध हवा मिळत नसल्याने शुद्ध हवा घेण्यासाठी व निसर्गाचे मनमोहक रूप पाहण्यासाठी मित्रांसोबत येतो.” नंतर मुळगावचा वडापाव खाऊन झालं की घरी जायच्या मार्गावर निघायचं.
– कौस्तुभ धुमाळ – बदलापूर
“महिन्यातून किमान एकदोन वेळा मित्रमंडळींसोबत आम्ही येथे येतो. पहाटे ६ ते ७ यादरम्यान आल्यास ९ ते १० पर्यंत पायऱ्या उतरून खाली जाऊ शकतो. त्यामुळे अर्ध्या दिवसाची का होईना सुंदर अशी एक छोटी पिकनिक होते.”
– अभिषेक मढवी, बदलापूर
कसे जाल ?
रेल्वे मार्गाने बदलापूर स्थानकात उतरून तेथून रिक्षामार्गे गावात येऊ शकता. बदलापूरहून ७ ते ८ किलोमीटर अंतरावर मूळगाव आहे. तसेच अंबरनाथ-बदलापूर एमआयडीसी रस्त्यामार्गे बदलापूर बोराडपाडा, म्हसा रोडमार्गे मूळगावात जाता येते. बारवी डॅम रस्त्यामार्गेही खासगी वाहनाने मूळगावात जाता येते. या ठिकाणी जाण्यासाठी एसटी बसचीही सोय आहे.